नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
धुळे/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यापासून कॉंग्रेसतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कोणाला उमेदवारी दिली जाईल , याबाबत धुळेकरांच्या मनात फार उत्सुकता लागून होती. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सनेर यांना उमेदवारी देण्यात येईल असे कॉंग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही कारण महाविकास आघाडी कडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. त्यानंतर या मुद्द्याला आता वेगळेच वळण लागले आहे.
काल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांमधून देखील नाराजी समोर आली असून आज कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या निवासस्थानाजवळ एकत्र येत घोषणाबाजी करीत उमेदवार बदलण्याची मागणी केली. कॉँग्रेस कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून बाहेरचा उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघात देण्यात आला असून आम्ही त्यांचा प्रचार न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे.
“धुळे लोकसभा मतदारसंघात पैसे असणाऱ्या उमेदवाराला मतदार विजयी करत नाहीत तर सर्वसामान्य उमेदवाराला विजयी करतात त्यामुळे काँग्रेसने निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास निश्चित काँग्रेसचा विजय होईल,पक्ष श्रेष्ठींनी याबाबतचा निर्णय न घेतल्यास आम्ही कठोर भूमिका घेऊ” अशी प्रतिक्रिया कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पक्षा अंतर्गत सुरू असलेली गटबाजी थांबेल का ? आक्रमक झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते माघार घेतील का ? उमेदवारीच्या मुद्द्याला अजून काही वेगळे वळण लागेल का? असे अनेक प्रश्न धुळ्यातील जनतेला पडले आहे.