नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान राज्यात बारावीच्या परीक्षा पार पडल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी बारावीच्या निकालाची वाट पाहत होते. शेवटी आज बारावीचा निकाल लागला. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आला. यावर्षी छ.संभाजीनगर मध्ये बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुली अग्रेसर आहेत.
विभागीय मंडळात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचे हार्दिक अभिनंदन बोर्ड तर्फे केले गेले. छत्रपती संभाजी नगर विभागीय मंडळामध्ये 1 लाख 74 हजार 51 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये एकूण 1 लाख 63 हजार 762 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.08 टक्के इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 3.27 टक्क्याने जास्त आहे. विभागीय मंडळ गुणवत्तेनुसार संभाजीनगरचा राज्यामध्ये पाचवा क्रमांक आलेला आहे. अशी माहिती विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी दिली.