नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्या नेतृत्वाखाली एका जर्मन शिष्टमंडळाने 7 जून 23 रोजी मुंबईतील पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. या शिष्टमंडळात जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव बेनेडिक्ट झिमर, जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाच्या सुरक्षा आणि संरक्षण धोरण विभागाचे महासंचालक डॉ. जॅस्पर विक, भारतातील जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिप अकरमन आणि इतर सदस्यांचा समावेश होता.
पिस्टोरियस यांनी यावेळी व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांड यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी या शिष्टमंडळासमोर पश्चिम नौदल कमांडची भूमिका, जबाबदाऱ्या आणि उपक्रम याविषयी सादरीकरण करण्यात आले.
आपल्या मुंबई भेटीदरम्यान पिस्टोरियस यांनी अत्याधुनिक स्वदेशी युद्धनौका आयएनएस मोर्मुगोवालाही भेट दिली. यावेळी त्यांनी भारतीय नौदलाच्या नौकानयन चमूतील महिला अधिकाऱ्यांसह भारतीय नौदलाच्या कर्मचार्यांशी संवाद साधला. त्यानंतर बोरिस पिस्टोरियस यांना मुंबई बंदराचीही सैर घडवण्यात आली.
मुंबई येथील पश्चिम नौदल कमांड मुख्यालयात संवाद साधल्यानंतर या शिष्टमंडळाने माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला भेट दिली. यावेळी या शिष्टमंडळाला माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडच्या स्वदेशी जहाज बांधणी क्षमतेची माहिती देण्यात आली. बोरिस पिस्टोरियस यांनी 07 जून 23 रोजी पश्चिम नौदल कमांड ऑफिसर्स मेस येथे आयोजित स्वागत समारंभात नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांच्याशी संवाद साधला.
2006 मध्ये भारत आणि जर्मनीने द्विपक्षीय संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही देशातील लष्कर संबंधी परस्परसंवादात लक्षणीय वाढ झाली आहे. सागरी क्षेत्रातील सहकार्य हा भारत आणि जर्मनी यांच्यातील सहभागाचा सर्वात मजबूत आणि महत्त्वाचा पैलू आहे. नौदलाची जहाजे आणि शिष्टमंडळांच्या प्रशिक्षण आणि परस्पर द्विपक्षीय भेटींचा या सहकार्य करारात समावेश आहे.
दोन्ही देशांच्या नौदलांनी सागरी क्षेत्राच्या समस्या , चाचेगिरीला प्रतिबंध , मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण यांवर आपले विचार मांडले. बोरिस पिस्टोरियस यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील .