नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – मुंब्रा रेतीबंदर किनारी पुन्हा एकदा जिलेटिनच्या कांड्या व डेटोनेटर्स मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकूण १६ जिलेटिनच्या कांड्या व १७ डेटोनेटर्स पोलिसांनी जप्त केले असून या कांड्या पाण्याखाली स्फ़ोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येतात अशी माहिती देण्यात आली. परंतु या कांड्यांपैकी अनेक कांड्या या जिवंत असल्याने त्या इतर ठिकाणी स्फ़ोट घडवून आणण्यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात.
मुंब्रा रेतीबंदर हे मृतदेह फेकण्यासाठी एक कुख्यात ठिकाण बनले असून येथे अवैधरित्या रेती उत्खननाचे काम देखील गेले अनेक वर्ष अविरतपणे सुरू आहे. याच ठिकाणी आत्तापर्यंत १६ मृतदेह देखील सापडले होते. असा काळा इतिहास असलेला हा रेतीबंदर भाग आज पुन्हा एकदा जिलेटीन कांड्या व डेटोनेटर्स मिळाल्याने चर्चेत आला.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कळवा रेती बंदर परिसर खाडीचे सुशोभीकरण करून येथे रेतीबंदर विसर्जन घाट बनवण्यात आला. या परिसरामध्ये असलेली निसर्गरम्य वातावरण लक्षात ठेवून महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली मात्र आता हीच सुविधा या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धोकादायक वाटत आहे. या परिसरात मागील वर्षभरात 15 मृतदेह सापडले आहेत. ज्यामध्ये दोन हत्या या उघडकीस आल्या आहेत या ठिकाणी असलेला सुरक्षेचा अभाव आणि शेजारीच असलेला राष्ट्रीय महामार्ग याचाच फायदा घेत गैरकृत्य करणारी लोक या भागात मृतदेह फेकत आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासन यांचा देखील हलगर्जीपणा होत असल्यामुळेच हे प्रकार येथे वारंवार घडत आहेत. दिवसभरात याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोंची आहे असे असले तरी रात्री या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते आणि याचाच फायदा घेत मृतदेह फेकण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत.
हत्या करून हायवे मार्गे या परिसरात सहजरीत्या येता येऊ शकतं रस्त्यावरती पोलीस नसल्याचा आणि या परिसरात सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत मृतदेह खाडीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खाडी मध्ये टाकलेला मृतदेह स्वतःहून नष्ट होण्याच्या मार्गावर असतो आणि म्हणूनच या परिसरात मृतदेह टाकण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत.
आता याच ठिकाणी जिवंत जिलेटिनच्या कांड्या व डेटोनेटर्स मिळाल्याने प्रशासन हादरले आहे. या आधी देखील अशा जिलेटीनच्या कांड्या वापर करून दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले होते. त्यामुळे खाडीकिनारी गस्त वाढवायची गरज असताना रात्रीच्या वेळी इथे मात्र स्मशानशांतता असते. एवढी गंभीर घटना घडल्यावर तहसीलदार घटनास्थळी उपस्थित राहणे अपेक्षित होते परंतु ते घटनेच्या ठिकाणी न आल्याने त्यांच्या एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने १६ जिलेटिनच्या कांड्या, १७ डेटोनेटर्स आणि दोन मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरु केली आहे. घटनास्थळावरून एक मोबाईलचा रिकामा खोका देखील मिळाला असून त्यावर असलेल्या imei नंबर चा वापर गुन्हेगारांना शोधण्या साठी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.