नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – धुळे शहरातून एक तरुण कमरेला गावठी कट्टा बाळगून फिरत आहे अशी माहिती धुळे एलसीबी ला मिळताच देवपुरात राहणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. ही कारवाई शहरातील चाळीसगाव रोड परिसरात केल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चाळीसगाव रोडवर एक तरुण गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाला रवाना करण्यात आले. चाळीसगाव रोडवरील एकता सर्कल भागात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवतात या तरुणाने आपण हा कट्टा विक्री करण्यासाठी आल्याचे सांगितले.
पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव भावेश मिलिंद जोशी असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती केली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळून आला. भावेश हा सराईत गुन्हेगार असून, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात देवपूर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार दोन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.