नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी -मुंबई – आग्रा महामार्गावरील लळींग घाटात आज भरधाव कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने पुढील आयशरसह पाच ते सहा वाहनांना धडक दिली. त्यात दोन वाहन चालक गंभीर जखमी झाले. तसेच पाच ते सहा वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
आज लळिंग घाटात भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे नियंत्रण सुटून कंटेनरने पुढील आयशरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आयशरच्या पाठीमागे असलेल्या चार ते पाच वाहनांना या अपघाताचा फटका बसला. या तब्बल पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी जखमी झाला होता त्याला कंटेनर मधून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली त्यासाठी त्याला कंटेनर मध्येच ऑक्सिजन देण्यात आला. तसेच कंटेनर मागील असलेल्या ट्रॉली मधील चालक देखील गंभीर जखमी झाला आहे या दोन्ही गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसेच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनरला बाजुला करीत रस्त्यावर ऑईल पसरल्याने वाहने घसरू नये म्हणून त्या ठिकाणी पावडर टाकण्यात आली. व वाहतूक सुरळीत करण्यात आली.