नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई / प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या धामधुमीत अनेक सार्वजनिक उत्सव मंडळ आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे जनमानसात लोकप्रिय होत असलेले पाहायला मिळतात. पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणपती आगमन, विसर्जन, आरास यासाठी काही मंडळांना जरूर भेटी देणे आवश्यक वाटते. नवी मुंबईत अशाच एका लाडक्या बाप्पाला पाहायला भक्तांची पाऊले मंडळाकडे वळत आहेत. नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील मोरया सार्वजनिक मंडळाने एका अनोख्या पद्धतीने या वर्षीची गणेश मूर्ती साकारली आहे.
मंडळाच्या सदस्यांनी गणेश उत्सवापूर्वी सहा महिने राज्यातील अष्टविनायक आणि पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपतीला वाहली गेलेली फुले एकत्र करून ती सुकवून त्याच्या पासून पावडर तयार करून त्या पावडरची गणेश मूर्ती साकारली आहे. असे करायला सहा महिन्यांचा कालावधी लागला आसून,संपूर्ण पर्यावरण पूरक अशी मूर्ती आहे. इतर मंडळांनी पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचणार नाही याची काळजी घेत,गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन मंडळांचे पदाधिकारी करत आहेत.
या अनोख्या युक्तीचे नवी मुंबईतील नागरिकांनी मंडळाचे कौतुक केले असून,बाप्पाच्या भक्तांनी त्यालाच वाहिलेल्या फुलांनी साकारलेल्या बाप्पाला पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. मंडळाचे जे बावीसाबे वर्ष असून मागील अनेक वर्षांपासून आपण पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करत असून,यापुढील प्रत्येक गणेश उत्सव पर्यावरणाची काळजी घेणारा असेल असे मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश पाले यांनी सांगितले.