नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीजबिल मिळावे, यासाठी गेल्या चार महिन्यात मीटर रीडिंग एजन्सींच्या कामात सकारात्मक सुधारणा झाली आहे. त्यात आणखी वाढ करून मीटर रीडिंगचे फोटो फेटाळले जाण्याचे प्रमाण शुन्यावर आणण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) यांनी दिले आहेत.
महावितरणच्या कल्याण परिमंडलांतर्गत कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले, ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग हा महावितरणच्या व्यवसायाचा प्रमुख गाभा आहे. गेल्या चार महिन्यात सातत्याने दिलेल्या सूचना व आढावा यामुळे कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत बहुतांश मीटर रीडिंगचे फोटो फेटाळले जाण्याचे प्रमाण एक टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. हे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच वीजबिल थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित होण्यास पात्र असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार आणि तत्काळ खंडित करावा. सद्यस्थितीत वीज ही मुलभूत गरज बनली असून विजेशिवाय एक दिवसही घरात राहणे कठीण आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई प्रभावीपणे राबवावी व कारवाईच्या ठिकाणी वीजवापर सुरू नसल्याची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरमहाच्या चालू वीजबिलासह मागील थकबाकी वसूलीवर भर देण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यांच्यासह कल्याण पूर्व अणि पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर एक आणि दोन या विभाग कार्यालयांचे कार्यकारी अभियंते, त्याअंतर्गत सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.