नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र भारतीय सैन्य दलाचे जवान विकी अरुण चव्हाण वय वर्षे 24 हा शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी ग्रीको रोमन रेसलरचा कुस्तीपटू सराव करत असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वीर जवानाच्या आई वडील व नातेवाईकांना कळताच त्यांनी एकच डोह फोडला तर संपूर्ण गावात व तालुक्यात शोककळा पसरली.हा जवान 2018 मध्ये भारतीय सैन्य दलाच्या 14 महार बटालियनमध्ये शिपाई पदावर भोपाळच्या सागर येथे भरती झाला होता. त्यानंतर परी शिक्षण पूर्ण करून तो जम्मू काश्मीर राज्यातील पुंछ राजोरी येथे कार्यरत होता. त्याचप्रमाणे विकी यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती त्यामुळे सैन्यात भरती झाल्यावर ग्रीको रोमन रेसलर या कुस्तीच्या स्पर्धा तो खेळू लागला. म्हणून ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय ग्रीको रोमन रेसलर स्पर्धेसाठी तो तयारी करत होता.
येथील स्पर्धेनंतर ते आंतरराष्ट्रीय ग्रीको रोमन रेसलर स्पर्धेसाठी जाणार होते. ते सराव करत असताना मार लागला व ते गंभीर जखमी होऊन मयत झाले.त्यानंतर विकी चव्हाण या शहीद जवानाचा मृतदेह चांदवड तालुक्यातील मूळ गावी आणून त्यांचा गावातून वाजत गाजत व भारत माता की जय विकी चव्हाण अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत हरनुल येथील गावठाण पटांगणात शासकीय इतमामात केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, डॉक्टर राहुल आहेर चांदवड देवळा मतदार संघ, माजी आमदार शिरीष कोतवाल, प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख चांदवड, तहसीलदार मंदार कुलकर्णी, चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, यांनी पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वीर जवानाला पोलीस पथक व आर्मी यांच्या मार्फत देखील सलामी देण्यात आली.यावेळी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार व आमदार राहुल आहेर माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.