नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या रेल्वे स्टेशन परिसरात अनेक दिवसांपासून लुटमारीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. चैन स्नेचिंग, चोरी करणाऱ्या काही टोळ्यांमुळे प्रवासी त्रस्त झालेले. कल्याण (Kalyan) स्टेशन परिसरात रात्री बेरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या 4 आरोपींना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील एका फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी पकडलेल्या चौघांपैकी दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केटमध्ये असलेल्या एका दुकानात काही तरुण लूटीच्या (Loot) इराद्याने येणार आहेत. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आहेत याची माहिती मिळताच, महात्मा फुले पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पथक नेमले होते. पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून चार तरुणांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील एक आरोपी संधीचा फायदा घेत पसार झाला आहे. आरोपींकडून चाकू, हतोडा अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. गोकूळ सोनावणे, उमेश सिंह, बुखन यादव , मुशेद खान अशी या चार चोरट्यांची नावे आहेत. या चौघांपैकी गोकूळ आणि उमेशच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात येणारे जाणाऱ्यांना गाठायचे. त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेत असे. अनेकदा प्रवासी तक्रार सुद्धा करीत नसे. अशा लोकांचा हे चोर फायदा घेत होते. या प्रकरणात पोलिस पुढील तपास करत आहेत.