नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक – केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज महाराष्ट्रात नाशिक मधील शिंदे येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या (इएमआरएस ) बांधकामाची पायाभरणी केली.नाशिकच्या दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हा या प्रस्तावित एकलव्य आदर्श निवासी शाळेचा उद्देश आहे.
जवळपासच्या आदिवासी भागात दर्जेदार शिक्षणाला चालना देण्यासाठी आदिवासी कार्य मंत्रालयाने शिंदे येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेची योजना आखली आहे, असे या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना अर्जुन मुंडा यांनी सांगितले. या एकलव्य आदर्श निवासी शाळेमध्ये सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
एकलव्य आदर्श निवासी शाळा योजना ही संपूर्ण भारतातील आदिवासींसाठी (एसटी अनुसूचित जमाती) आदर्श निवासी शाळा तयार करण्याची योजना आहे, असे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. ईशान्य क्षेत्र , छत्तीसगड, गुजरात, ओडिशासह विविध राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या शाळांची योजना आखण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी पंतप्रधानांनी मांडलेला दृष्टीकोन आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी मांडलेल्या शिक्षणासंदर्भातील भूमिकेबद्दलही अर्जुन मुंडा यांनी यावेळी भाष्य केले. आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आदिवासी व्यवहार मंत्रालय युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे , असेही त्यांनी सांगितले.
आजूबाजूच्या भागातील आदिवासी शेतकरी हे द्राक्षे, स्ट्रॉबेरी, कांदे इत्यादींची शेती करत असल्याचे पाहून केंद्रीय मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले.
पायाभरणीनंतर आदिवासी नृत्य आणि संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
50% पेक्षा जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि किमान 20,000 आदिवासी लोकसंख्येसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा सुरु करण्याची घोषणा 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. सरकारने देशभरात अशाप्रकारच्या 452 नवीन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा विकसित केल्या जात आहेत,या शाळांमध्ये केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावरच नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.या शाळा सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात, प्रत्येक शाळेत 480 विद्यार्थ्यांची क्षमता आहे.
सध्या, शहरात 384 शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये नवोदय विद्यालयाच्या बरोबरीने, क्रीडा आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच स्थानिक कला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी विशेष अत्याधुनिक सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच, एकलव्य आदर्श निवास शाळा या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आवारातील गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधांनी सुसज्ज आहेत, या शाळांमध्ये विनामूल्य शिक्षणासोबतच जेवणाची आणि राहण्याचीही मोफत सुविधा आहे.