कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण मधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात गेल्या तीन दिवसांपासून सामजिक संस्थेचे आमरण उपोषण सुरु असून या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भेट देत पाठींबा दर्शविला आहे. तसेच या तलावावर असलेले अतिक्रमण त्वरित हटवून कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
भटाळे तलाव हा कल्याण मधील ऐतिहासिक तलाव असून याठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे. याठिकाणी अनधिकृत तबेले आहेत, अनधिकृतपणे घोडे बांधले जातात. यामुळे तलाव नष्ट झाला असून हि अतिक्रमणे हटवून संबंधितांवर कारवाई करून या तलावाचे सुशोभिकरण करण्याची मागणी यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या या तलावात देखील भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याविरोधात निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे, ठाणे जिल्हा अध्यक्षा आसीया रिझवी आणि इतर कार्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.