नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
पंढरपूर/प्रतिनिधी – कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना जातीस्तजास्त सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून या अंतर्गत श्री विठ्ठल रूक्मिणीच्या पादस्पर्श दर्शन रांगेतील वारकऱ्यांसाठी चार विश्रांती कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यात्रा काळात श्री विठ्ठल व रूक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी अठरा ते वीस तासाचा कालावधी लागतो. दर्शन रांगेतील या भाविकांना विश्रांती मिळावी किंवा आजारी वारकऱ्यांना उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने यंदा गोपाळपूर पासून स्मशानभूमि पर्यंतच्या पत्राशेड पर्यंत चार ठिकाणी विश्रांत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाविकांना उपचार करण्यासाठी डॉक्टरांची देखील नियुक्ती केली जाणार आहे.वयोवृध्द, आजारी भाविक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या भाविकांना पुन्हा दर्शन रांगेत जाण्यासाठी टोकन देखील दिले जाणार आहे. तसेच दर्शन रांगेत भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची देखील सोय केली जाणार आहे. प्रथमच या सुविधा दिल्यामुळे भाविकांसाठी विठुरायाचे दर्शन सुलभ होणार आहे.
दरम्यान मागील चार वर्षा पासून बंद असणार जनावरांचा बाजार यंदा भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोना व लम्पी आजारामुळे कार्तिकीमध्ये भरणार प्रसिध्द जनावरांचा बाजार यंदा पासून सुरू होत आहे. वाखरी येथील पालखी तळावर हा बाजार भरणार असून खबरदारीची उपाययोजना म्हणून गाय, बैल यांच्यासाठी वेगळे विभाग करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी जनावरांच्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून ते जनावरांची तपासणी करूनच बाजारात प्रवेश देणार आहेत.
यासह आषाढी प्रमाणे कार्तिकी वारीमध्ये देखील वारकऱ्यांसाठी ६५ एकर येथे आरोग्य शिबिर होणार आहे. चंद्रभागेत भाविकांच्या स्नानासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून १४ किंवा १५ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.