नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – अमरावती महानगरपालिकेमध्ये गेले पाच वर्ष भाजप ची सत्ता होती. अमरावती शहराला स्मार्ट सिटी करण्याचे गाजर भाजप द्वारे नागरिकांना देण्यात आले. स्मार्ट सिटी तर झालीच नाही. परंतु, संपूर्ण महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरून काढत डबघाईस आणून ठेवलेली आहे, असा आरोप करत काँग्रेसने महानगरपालिकेवर एल्गार मोर्चा काढला.
महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण कारभार तातडीने सुधारावा तसेच स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे, वृक्षारोपण, शहरातील परिसरात फवारणी, मोकाट जनावरे पकडणारी वाहने ही सर्व कामे तातडीने सुरळीत करण्यात यावी. जनतेच्या या मूलभूत प्रश्नांवरून काँग्रेस पक्षाने सातत्याने आंदोलने केलेली आहेत.
आता हा निर्वाणीचा लढा काँग्रेस पक्षातर्फे जनतेच्या वतीने लढण्यात येत असल्याचे काँग्रेस कडून सांगण्यात आले आहे. मात्र, हा मोर्चा महानगरपालिकेवर पोहोचला असताना मोर्चेकऱ्यांना महानगरपालिकेत न जाऊ दिल्याने अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर रस्ता अडवून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.