नेशन न्यूज मराठी टीम.
गोंदिया / प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्याचा सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-सातगाव-तिरखेडी रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून देखील या रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे आपली जबाबदारी स्वीकारत थेट जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे व पंचायत समिती सदस्या रेखा फुंडे आता मैदानात उतरल्या असून जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
गोंदिया जिल्ह्याचा सालेकसा तालुक्यातील साखरीटोला- सातगाव- तिरखेडी रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या दोन वर्षापासून हा रस्ता अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या शेतकरी, विद्यार्थी, नागरिक व कर्मचाऱ्यांना तिरखेडी येथे जाण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे. जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे व पंचायत समिती सदस्या रेखा फुंडे यांनी वारंवार या रस्त्याच्या सुधारणा व पुनर्बांधणीची मागणी केली होती. हा रस्ता सुधारणेसाठी विविध आंदोलनही केले होते. मात्र, नुसती आश्वासने मिळाली व प्रत्यक्ष काम झालेले नाही.
रेल्वे विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्रामुळे हा रस्ता तयार होत नव्हता. मात्र, रेल्वे विभागाने ना-हरकत प्रमाणपत्र देत तत्काळ रस्ता बांधण्यास सांगितले आहे. ना हरकत प्रमाणपत्र देऊन तीन महिने उलटूनही हा रस्त्याचे काम चालू झाले नसल्याने शेकडो नागरिक, विद्यार्थी व शेतकरी त्रस्त झाले आहेत. नागरिकांची या रस्त्या अभावी वैयक्तिक व विकासकामे रखडली आहेत. कामांचा वेग वाढावा आणि रस्ता दुरुस्तीसाठी जबाबदारी निश्चित करावी या मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्या कटरे व पंचायत समिती सदस्या फुंडे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे आहे.