नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली / प्रतिनिधी – परधर्मसहिष्णुता या संविधानिक मूल्यांचा खरा अर्थ आपल्या कृतीतून गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात पहायला मिळाला आहे. केवळ पावसापासून मूर्तीचे रक्षण व्हावे म्हणून मशिदीतील जागा मंडळाला देवू करत भाईचाऱ्याचे दर्शन घडविले गेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जेथे मुस्लीम समाजाने आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. गेल्या ४३ वर्षांपासून मुस्लीम समाज ही परंपरा जोपासत आहे.
४३ वर्षांपूर्वी गोटखिंडी गावात झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. पण त्यावेळी प्रचंड पाऊस झाला. आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील बुजुर्ग मंडळींनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. गणपतीचे पावसापासून रक्षण केले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी गावात एक मीटिंग घेतली गेली. आणि या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली. त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होऊ लागली.
मुस्लिम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा,आरती करून प्रसादाचे वाटप करतात. सर्व गावकरी यावेळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.