नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान होतील. वरिष्ठ गटाच्या ८० महिला खेळाडूंचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ या स्पर्धेत असतील. जळगाव येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील महिला खेळाडूंचाही समावेश आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जाईल.
स्पर्धेचे उदघाटन दि. १५ सप्टेंबर ला सकाळी ८.३० वाजता अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होईल. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौन्सील सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे (परभणी), अॅपेक्स कौन्सील सदस्य राजेंद्र काणे(जालना), जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेशदादा जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार
व युसूफ मकरा, सहसचिव अविनाश लाठी, सचिव अरविंद देशपांडे व कार्यकारिणी सदस्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील.
स्पर्धेचा उद्घाटन सामना महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९वाजेला रंगेल. तर दुपारी १ वाजेला तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात होईल.अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे,अॅपेक्स कौन्सिल सदस्य अतुल जैन व राजेंद्र काणे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली आहे.