नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – शालेय विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) नवी दिल्ली येथे, आर्थिक साक्षरतेवरील अखिल भारतीय प्रश्नमंजुषेच्या तिसर्या विभागीय स्तरावरील फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील राज्यस्तरीय विजेत्यांचा सहभाग होता.
प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम ब्लॉक (प्रभाग) स्तरावर आणि त्यानंतर जिल्हा आणि राज्य स्तरावर आयोजित करण्यात आली होती. सरकारी शाळांमधील आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि जागरूकता याबाबत गोडी निर्माण व्हावी, म्हणून त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या विभागा अंतर्गत येणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 5,132 शाळांमधील अंदाजे 10,264 विद्यार्थ्यांनी प्रभाग स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला. आर्थिक साक्षरता ग्राहकांना माहितीपूर्ण निवड करण्यासाठी सक्षम बनवून आर्थिक समावेशाच्या उद्दिष्टाला पाठबळ देते, ज्यामुळे पर्यायाने त्यांचे आर्थिक कल्याण होते. आर्थिक समावेशकता म्हणजेच, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने सर्वांसाठी परवडणारी आर्थिक सेवा सहज उपलब्ध करणे. यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. आणि अश्या प्रश्नमंजुषा शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतील.