नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
गोवा/प्रतिनिधी – गोव्यामध्ये नोव्हेंबर 20 ते 28, 2022 या काळात आयोजित करण्यात आलेल्या यंदाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2022, चित्रपट रसिकांना एक नवीन आणि रोमांचक अनुभव देणार आहे. इफ्फी 2022 चा भाग म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तंत्रज्ञान आणि चित्रपट कला/सिनेमा आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित विविध घटकांची ओळख करून देणारे प्रदर्शन आयोजित करणार आहे.
53 व्या इफ्फी मधील हे प्रदर्शन मनोरंजन तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहिती देईल. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या चित्रपट रसिकांना चित्रपट कला आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित तंत्रज्ञानाचा परस्पर संबंध उलगडून दाखवला जाईल आणि हे घटक एकत्र येऊन प्रेक्षकांचा अनुभव कसा समृद्ध करतात, याची माहिती दिली जाईल.
हे प्रदर्शन पणजीमध्ये डी बी रोड इथल्या कला अकादमी जवळच्या फुटबॉल मैदानात आयोजित करण्यात आले असून ते 21-27 नोव्हेंबर, 2022 या दिवसांमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळात सुरु राहील. सोनी, कॅनन, रेड, लीका, अल्टास, डीझेडओ, अपुचर लाइट्स, हंसा सिने इक्विपमेंट यासारखे सिनेमा उपकरणांचे प्रमुख उत्पादक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या प्रदर्शनात अशी अत्याधुनिक उपकरणे प्रदर्शित केली जातील, ज्याचा वापर सध्याचे उद्योग तज्ञ सिनेमा निर्मितीसाठी करत आहेत. प्रदर्शनात अशा 20 तंत्रज्ञान कंपन्या/विक्रेत्यांना सहभागी होण्याची तरतूद आहे, आणि यात कॅमेरे, लेन्स, लाइट्स, ग्रिप्स, कलर ग्रेडिंग सॉफ्टवेअर, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, एआर, व्हीआर, ऑडिओ मॉनिटर्स, ध्वनीशास्त्र, रिअल टाईम डबिंग, टॉक-बॅक, जतन आणि संवर्धन इ. तंत्रज्ञानाच्या निर्मात्यांचा समावेश असेल. 7000 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या प्रदर्शन स्टॉल्स व्यतिरिक्त, प्रदर्शनाच्या ठिकाणी चर्चा आणि विविध सत्रांसाठी समर्पित जागा देखील असतील.