नेशन न्यूज मराठी टीम.
इगतपुरी/प्रतिनिधी – राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळेतील शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी या शाळातील शिक्षक हे शिक्षक दिनीच म्हणजे ५ सप्टेंबर पासून आपापल्या शाळेत आमरण उपोषणाला बसले आहेत. या शिक्षकांनी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्यासह आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
निवेदनानुससार, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक या संस्थेमार्फत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये राज्यात 39 एकलव्य निवासीसुरु आहेत. त्यात सरळ सेवा भरतीद्वारे २०१८ व २०१९ च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र सन २०२१ व २०२२ मधील नियुक्ती आदेशात परीविक्षा कालावधी विलोपित होणे.अपेक्षित होते. परंतु कामाचे मुल्यांकन अहवाल जाऊनही तो पूर्ण केला गेला नाही. परिविक्षा कालावधी विलोपित करून नियमित वेतनश्रेणी अद्याप पर्यंत लागू करण्यात आलेली नाही.
दिल्ली येथील केंद्रीय जनजाती आदिवासी आयुक्त आणि नेस्ट यांनीही चर्चेअंती आश्वासन देऊनही प्रश्न प्रलंबितच ठेवला आहे. त्यामुळे सन २०१८ व २०१९ चे सर्व कर्मचारी हे शिक्षक दि. ५ सप्टेंबर पासून आपापल्या शाळेत कर्तव्यावर हजर राहून उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत परिविक्षाधीन कालावधी विलोपित होऊन नियमित वेतन श्रेणी लागू होत नाही तोवर आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी इगतपुरी तालुक्यातील पिंपरी व टीटवे येथील एकलव्य निवासी शाळेतील उपोषणाला बसलेल्या शिक्षकांच्या वतीने देण्यात आला आहे.
उपोषण काळातही शिकविणार या ३७ शाळांमध्ये एकूण ४०६२ मुले तर ४०९० मुली अशा एकूण ८१५१ आदिवासी विद्यार्थी सीबीएससीचे शिक्षण घेत आहेत. शिक्षक उपोषण काळात विद्यार्थ्यांना शिकवून उपोषण करणार आहेत. आंदोलनातही विद्यार्थी हिताची काळजी घेणाऱ्या या शिक्षकांसंदर्भात शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे