नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे संपून शेवटचा टप्पा तोंडावर आला तरी सर्वच पक्ष स्वतःच्या प्रचारात गुंग दिसत आहे. सामन्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र आहे. नाशिक मधील दिंडोरी लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्याशी होणारी लढत अनेक कारणांमुळे चुरशीची ठरत आहे.
भारती पवार यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. येथील सभेअगोदर लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून आपला राग व्यक्त केल्याचे दिसले. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी काढली असून सुद्धा शेतकरी सरकारवर नाखुश आहेत. कारण सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी काढली असली तरी कांद्याला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या तसेच कांदा व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. ज्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी अनेक दिवसांपासून अंदोलने करत आहेत. पण आज नाशिकात पंतप्रधान सभेसाठी येणार हे कळताच शेतकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले. तसेच सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. पण लासलगाव पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 15 शेतकाऱ्यांना कांद्याच्या माळासह ताब्यात घेतले. तर शेतकरी व्हॅाट्सअप ग्रुप ॲडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटीसा दिल्या आहे.