नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पंढरपूर/प्रतिनिधी – राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये अनेक सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आज राज्यात शेतीविषयक अनेक समस्या आहेत. कुठे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर, कुठे पाण्याच्या कमतरतेमुळे पीक जळून गेले. या आणि अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग ग्रासलेला आहे.
पंढरपूर मधील कासेगाव परिसरातील कालवा अनेक दिवसांपासून पाण्यावाचून कोरडा पडला आहे. कासेगावतील नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायाच्या माध्यमातून होत आहे. पण पिकांना पाणी पाजण्यासाठी कालव्यात पाणीच नसल्याचे शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे कासेगाव हद्दीत असणाऱ्या सातवा मैल नजीक जलसंपदा विभागाचा नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, शाखा पंढरपूर फाटा क्रमांक १४ समोर कासेगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
कासेगाव परिसरातील अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही. असे सांगून शेतकऱ्यांना थांबवले परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत असल्याचे पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी एक ते तीन तारखेपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र, आज १३ तारीख उलटूनही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.