नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पंढरपूर/प्रतिनिधी – यंदा वाढत्या उन्हामुळे बहुतांश भागातील तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जोरदार जाणवत आहे. मात्र याचा सगळ्यात वाईट परिणाम हा शेतकऱ्यांवर होत आहे. कोणत्याही पिकासाठी योग्य हवामानाबरोबरच मुबलक पाणी सुद्धा महत्वाचे असते. पण वाढत्या तापमानाने अनेक लहान मोठी धरणे, नद्या आणि कालवे कोरडी पडत आहे. दुष्काळाचे भीषण सावट आणि पाणीटंचाई याने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याची अक्षरशः दुर्दशाच केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरातील अधिकतर शेतकरी द्राक्ष बागेचे उत्पन्न घेतात. निरा भाटकरच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर या भागातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. असे असताना गेल्या दीड महिन्यापासून कालव्याला पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशात द्राक्ष बागांना पाणी कुठून द्यायचे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. द्राक्ष बाग उन्हाने जळून खाक झाल्यामुळे द्राक्षबाग पूर्णपणे काढून टाकून टाकण्याचा निर्णय कासेगावातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्याला एकरी सात ते आठ लाखाचे नुकसान देखील झाले. द्राक्षबागेचे झालेल नुकसान याने शेतकरी खचून गेला आहे. पाण्याच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता द्राक्ष बाग काढून टाकून मोलमजुरीला जाण्याचा विचार करत आहे.