अकोला/प्रतिनिधी – पावसाळा सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभरात शेतकर्यांची शेतीच्या कामासाठी एकच लगबग सुरू आहे. जास्त उत्पन्न देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे घेण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या कृषी केंद्रावर रोज मोठ्या संख्येने नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
कित्येक जण बियाणे घेण्यासाठी 40 किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्याच्या कृषी केंद्रावर आले आहेत. मात्र यंदा बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्याला हव्या असणाऱ्या बियाणांची मागणी पूर्ण होत नसल्याने शेतकरी राजा संतप्त झाला आहे. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन्हाच्या तपमानाचा पारा 45 अंशाच्या पार गेला आहे. इतक्या धगधगत्या गरमित सुद्धा पहाटेपासून रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात २-३ बियणांचे पॅकेट दिले जात आहे. यावरूनच अकोल्यातील शेतकऱ्याचा बियाणांसाठी संघर्ष सुरू आहे असे म्हणायला वावगे ठरणार नाही.