नेशन न्यूज मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी- वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या शाळा प्रवेशासाठी 12 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी कळविली आहे.
वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन २०२३-२४ ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात दि. ०५एप्रिल २०२३ रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्यस्तरावरुन पूर्ण करण्यात आली असून सदर निवड प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी टप्पा क्र.1 मध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण 2975 अर्जांची निवड झाली आहे. प्रतिक्षा यादी क्र.1 मध्ये निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दि. 12 जून 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
पालकांनी प्रवेश पत्र तसेच हमी पत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका/ महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून विहित कालावधी दि. 12 जून २०२३ पर्यंतच आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर संदेश (एसएमएस) प्राप्त होतील. परंतु फक्त संदेशावर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती या सदराखालील अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहेत.
प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे, याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषद ठाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी कळविले आहे