नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – देशाचे भावी नागरिकअसेलल्या विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनेतील भारत रेखाटण्याची संधी शाळेत निबंधात दिलेली आपण अनुभवली आहे . मात्र प्रत्यक्षात चित्राच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा सहभाग देखील नोंदवता येतो . हि संधी विद्यार्थ्यांना निवडणूक कार्यालयाने दिली आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा मतदार जनजागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घोषित केलेल्या जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य निर्मितीसाठीच्या ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेला 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने “अभिव्यक्ती मताची” अंतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावली https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मिडीया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (फाईन आर्ट) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट, 2023 ते 5 ऑक्टोबर, 2023 असा आहे.
तरी ठाणे जिल्ह्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालय आणि कला शिक्षण (फाईन आर्ट) महाविद्यालयाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.