नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली / प्रतिनिधी – इस्लामपूरच्या उपक्रमशील असणाऱ्या मुक्तांगण प्ले स्कूलने विविध फळ बिया वापरून इकोफ्रेंडली राख्या बनविल्या आहेत. त्या गडचिरोली पोलीस दलातील जवानांना बांधल्या जातील. रक्षाबंधनानंतर गडचिरोलीच्या जंगलात या राख्या जमिनीत रुजवल्या जाणार आहेत. त्यातून रोपांची निर्मिती होणार आहे. या रोपातून बहीण-भावाचे नाते निसर्गात रुजेल.
बियांपासून बनवलेल्या राख्यांसोबत रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्या हातांनी पर्यावरण पूरक राख्या बनवल्या आहेत. गडचिरोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना १०० राख्या पाठण्यात आल्या आहेत. ते पोलीस दलातील जवानांना या राख्या सुपूर्द करतील.
शाळेतील शिक्षकांच्या मदतीने मुलांनी रंगीत कागद, पुठ्ठा याचा वापर करून विविध भौमितिक आकृत्या कात्रीने कापून घेतल्या. त्या पासून कल्पकतेने विविध आकाराचा वापर करून राखी तयार केल्या आहेत. गारमेंट मधील कटींग केलेल्या टाकाऊ कापडी पट्या, सुती धागा, चिंच, सीताफळ, पेरू, लिंबू, चिकू, या बियांचा वापर करून रंगीबेरंगी आकर्षक राख्या बनवल्या आहेत.टाकाऊ वस्तू वापरताना एस.के.पेपर्स व गारमेंट यांचे सहकार्य लाभले आहे. त्यांनी टाकाऊ पेपर्स, कापड उपलब्ध करून दिले. यामध्ये प्लास्टिकचा कोठेही वापर केलेला नाही.
या राख्या जमिनीत रुजवल्यास व पाणी घातल्यास बीजांकुरण होईल व फळांची नवी रोपे तयार होतील. ती रुजल्यानंतर रक्षाबंधनाची आठवण देणारे झाड चिरकाल स्मरणात राहील अशी संकल्पना आहे.गडचिरोली येथील पोलीस जवान गस्तीसाठी अनेकदा जंगलात जातात. राखी पौर्णिमेला या जवानांना राख्या बांधल्या जातील. त्यानंतर ते जवान बिया असणाऱ्या पर्यावरण पूरक राख्या जमिनीत रुजवतील. पालकांनी बिया गोळा करून स्कूल मध्ये दिल्या. त्या आम्ही मुलांना दाखवल्या.
लहानपणापासून मुलांना बिया समजाव्यात, त्यानी त्या साठवून ठेवाव्यात हा उद्देश आहे. या राख्या बनवताना वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, षटकोन, आयत यांची ओळख करून दिली गेली. त्या त्या आकाराच्या राख्या बनवून बिया चिकटवल्यावर मुलं हरवून गेली. यापूर्वी मुक्तांगण स्कूलच्या माध्यमातून निसर्गाच्या कुशीत २६ हजार सीड बॉल टाकले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लहानपणी संस्कार दिले गेले आहेत असे शिक्षकांनी सांगितले.