महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन

मुंबई/प्रतिनिधी – ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि दिनांक 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ऊर्जा संवर्धन आठवडा म्हणून राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाहून ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व चित्रफितीद्वारे दाखवणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखूवन सुरूवात केली. या चित्ररथावर राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत असून या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना ऊर्जा बचतीचा संदेश दिला जाणार असून ऊर्जा बचतीचे महत्व पटवून दिले जाणार आहे.

महाऊर्जातर्फे राज्यात ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजनेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या योजनेमध्ये 17 विविध क्षेत्रामधून विविध घटक (औद्योगिक, व्यावसायिक इमारती, शासकीय इमारती, लघु व मध्यम उद्योग, एमआयडीसी इ.) सहभागी होतात. 16 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण 78 घटकांनी सहभाग नोंदविला असून 46 विजेत्यांची यादी महाऊर्जा संकेतस्थळावर ऊर्जा संवर्धन दिन दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील आकाशवाणी, रेड एफ.एम. व 91.1 एफ.एम. या रेडिओ चॅनलद्वारे ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान “एक मंत्र आणि एक विचार, वीज बचतीचा करु प्रसार….” या रेडिओ जिंगलचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्सचे वितरण महाऊर्जा विभागीय कार्यालयांमार्फत ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

महाऊर्जामार्फत राज्यातील 400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली असून ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात येत असून वास्तुविशारद / कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन करण्यात आले असून त्यातून निवड केलेले चित्र महाऊर्जा कार्यालयाच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच इतर शासकीय / निमशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर सदर चित्रे रंगविता येणार असल्याची माहिती डॉ.राऊत यांनी दिली.

राज्यातील विविध घटकांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून वेबिनारचे आयोजन ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे. तसेच अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धन संयंत्राची माहिती होणेसाठी तसेच ऊर्जा परीक्षणासाठी या संयंत्राचा वापर कशाप्रकारे केला जातो याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी, महाऊर्जा मुख्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×