नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नांदेड/प्रतिनिधी – मराठवड्यातील लाखों विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अमूल्य असे योगदान राहिलेले आहे. दुष्काळी भागात गणना केल्या जाणाऱ्या मराठवाड्यामधील गरीब घरातील हजारो विद्यार्थी येथे शिकत आहे. हे विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणातून रोजगाराच्या नवीन संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आले आहे. या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या वर्षीपासून रोजगारभिमुख अभ्यासक्रमाची सुरुवात करत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना 1 जून पासून सुरुवात होणार आहे. यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच रोजगारभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठवाड्याच्या विकासात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे नेहमीच योगदान राहीले आहे. यात पुढचे पाऊल टाकण्याच्या दृष्टिने नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर स्तरावर एम.एस्सी.डेटा सायन्स, जिओइन्फाँर्मटिक्स, औद्योगिक मानसशास्त्र, पदविस्तरावर बी.एस्सी डेटा सायन्स, इंटेलिजन्स, मशीन लर्निग, बी.बी.ए, बी.एम.एल.टी. न्यूट्रियन अँड काँस्मेटिक्स, सायबर सिक्युरिटी अशा प्रकारचे रोजगार उपलब्ध होणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासोबतच व्हँल्यू अँडेड अभ्यासक्रमही यावर्षी पासून सुरु करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून राबविले जाणार असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिली.