नवीमुंबई/प्रतिनिधी – अॅन्टी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी यांच्या राहत्या घरी दरोडा टाकणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. फक्त ९ तासामध्ये पोलिसांनी सदर गुन्ह्याची उकल केली आहे.
ऐरोली नवी मुंबई येथील राहत्या घरी ६ अनोळखी इसमांनी एकमताने अॅन्टीकरप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून अधिकाऱ्याच्या घराची झडती घ्यावयाची आहे असे सांगत घरामध्ये प्रवेश केला. यावेळी भामट्यांनी घरातील रोखरक्कम व सोन्याचे विविध दागिने, २ मनगटी घडयाळे व चामड्याची बॅग असा एकूण ३४,८५,००० रूपयांचा मुद्देमाल फिर्यादी व त्यांचे पत्नीस धमकावून सिने स्टाईलने दरोडा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली होती. अँटी करप्शन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून ‘सव्वा तासामध्ये तब्बल ३४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन या भामट्यांनी पलायन केले होते. या घटनेची चर्चा सुरु झाली होती. आता या घटनेमध्ये 11 आरोपींना अटक करण्यात आले असून तीन आरोपी फरार असल्याचे यांनी सांगितले. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.अशी माहिती विवेक पानसरे पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी दिली आहे.