डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत आढळून आले आहे. या मोहिमेत २० जणांविरुद्ध कारवाई करून ६ लाख ४ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. तर दोन ठिकाणी अनधिकृत वीजवापर आढळून आला.
महावितरणच्या डोंबिवली विभागात ९ नोव्हेंबरला वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. एकूण ११ पथकांच्या माध्यमातून नवापाडा, गावदेवी परिसर, ठाकूरवाडी, रेतीबंदर परिसरात १९३ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात २० ठिकाणी ६ लाख ४ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. बहुतांश ठिकाणी मीटरकडे येणाऱ्या केबलला सहज लक्षात येणार नाही अशा पद्धतीने दुसरी केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. विहित मुदतीत ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. तर दोन ठिकाणी आढळलेल्या अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये; अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.