नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय निवडणूक आयोगाने आज राज्यांमध्ये कार्यरत मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांसोबतच्या संवादात्मक सत्रात ‘बीएलओ ई-पत्रिका’ हे नवीन डिजिटल प्रकाशन प्रकाशित केले. राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 350 हून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सहभागी झाले होते आणि राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या नजीकच्या राज्यांतील 50 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते. 10 लाखांहून अधिक मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम (https://www.youtube.com/watch?v=vNI2qtQD5VA ) या भारतीय निवडणूक आयोगाच्या यु ट्यूब वाहिनीवर देखील थेट प्रसारित करण्यात आला आणि सामायिक करण्यात आला.
आयोगासोबतच्या संवाद कार्यक्रमामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उत्साहाने सहभागी झालेआणि त्यांनी त्यांचे अनुभव, कर्तव्ये पार पाडताना त्यांना येणारी आव्हाने आणि यशोगाथा सामायिक केल्या. आजचा कार्यक्रम हा निवडणूक आयोगाचा देशभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबतचा पहिल्याच अशा प्रकारचा थेट संवाद होता. या कार्यक्रमादरम्यान निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे ) उपस्थित होते.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे, सर्वात प्रभावी क्षेत्रीय संस्थात्मक व्यक्ती असल्याने निवडणूक आयोगाच्या प्रणालीचा अविभाज्य भाग म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात,असे या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अधोरेखित केले. लोकांसोबतच आयोगाशीही थेट संबंध असल्याने, लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांचा सहभाग सुलभ करण्यासाठी ते भारतीय निवडणूक आयोग प्रणालीचे मूलभूत घटक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. मतदान केंद्र स्तरीय अधिकारी निवडणूक आयोगाच्या स्वरूपात प्रत्यक्षात कार्यरत आहेत. ते आयोगाचे कार्य आहेत ,आयोगाचा दृष्टीकोन आणि सूरही ते आहेत म्हणूनच तुम्हा सर्वांचे मनापासून आभार अशा भावना कुमार यांनी व्यक्त केल्या.
बहुआयामी उपस्थितीने मतदारांना घरापर्यंत सेवा सुनिश्चित करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे संस्थात्मक सामर्थ्य निवडणूक आयोगाने जाणले आहे. देशभरातील प्रत्येक मतदारासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे माहितीचे प्राथमिक स्त्रोत आहेत, असे राजीव कुमार यांनी सांगितले. उत्तम माहिती असलेल्या आणि प्रेरित मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांसाठी माहितीच्या प्रवाहाचे प्रारूप सुनिश्चित करणे हा बीएलओ ई-पत्रिका प्रकाशित करण्यामागचा हेतू आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.