नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – प्लास्टिक टाळण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्लास्टिक घरात येत असते. कधी दुधाची पिशवी, चॉकलेट, चिप्स, कोल्ड्रिंक्स बॉटल व बिस्किटंची पुडे यांच्या माध्यमातून येत असते. मात्र हे टाळता येणारे नसते. जरी टाळता येत नसले तरी प्लास्टिक हे कचऱ्यात न जाता त्याचा पुनर्वापर कशाप्रकारे होऊ शकेल या विचारातून एक पूल पुढे टाकत कल्याणच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल, कल्याण डोंबिवली महापालिका आणि सोलेस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतीच इको ब्रिक संकलन मोहीम राबविण्यात आली.
इकोब्रिक संकलन मोहीमेत सहभाग घेत मुलांनी आपल्या घरातील टाकाऊ प्लास्टिक संकलित करून ते एका प्लास्टिक बॉटलमध्ये भरून प्लास्टिक बॉटलचे ब्रिक्स तयार केले. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इको ब्रिक्स गोळा करण्याच्या कार्यात उत्साहाने भाग घेत ७० किलो वजनाच्या इको ब्रिक्स गोळा केला आहे. हे इकोब्रिक्स शहर सौंदर्यीकरण या अभियानासाठी विविध ठिकाणी त्याचा वापर केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हे इकोब्रिक्स साकारण्याठी विद्यार्थ्यांची खरी मेहनत होती. यातून पर्यावरण संवर्धन होईलच. त्याचबरोबर इकोब्रीक्सच्या माध्यमातून उत्पन्नाचे छोटेसे माध्यमही उपलब्ध होऊ शकेल अशी प्रतिक्रिया सोलेस इंडियाच्या डॉ. रुपिंदर कौर यांनी दिली. यावेळी शहर समन्वयक गितेश झुंजारराव, हेमंत दुर्गवाले, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या संजीवनी बोस आदींसह शिक्षकांचे तर केडीएमसीच्या घनकचरा उपयुक्त यांचे मोहिमेला सहकार्य लाभले.