नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – इगतपुरी येथील शिवाजी नगर, पंढरपूर वाडी, सह्याद्रीनगर येथील रहिवाशांना गेल्या बारा दिवसांपासून भावली पाणीपुरवठा योजनेची नवीन पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा होत नाही. नगरपरिषद प्रशासनाला वारंवार सांगूनही पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी चक्क टँकर मागविण्याची वेळ आली आहे.
शेवटी आज येथील संतापलेल्या रहिवाशांनी थेट आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली नरपरिषद कार्यालय गाठत नगर पालिका कर्मचाऱ्यांना बाहेर काढत नगर पालिका बंद केली.नगरपालिकेच्या मुख्य गेट समोर ठिय्या आंदोलन केले.जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला.
मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. परिस्थिती लक्षात घेता इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी मध्यस्थी करून मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. आज कुठल्याही परिस्थितीत 4 वाजेपर्यंत पाणी येईल असे सांगत आंदोलकांची समजूत काढत ठिय्या मागे घेण्याचे आवाहन केले. आंदोलकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन स्थगित केले. यामुळे नगर परिषद परिसरात एकच गोंधळ उडाला होता. जर आज पाणी आले नाही तर उद्या परत नगर परिषद कार्यालय बंद करण्याचा इशारा देत आंदोलन कर्ते माघारी फिरले.