ठाणे/प्रतिनिधी – नागरिकांच्या प्रवासाला सुखकर करणाऱ्या रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्याने आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. ठाणे (Thane) रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे वरील सगळ्यात जास्त गजबजलेले स्थानक मानले जाते. पण आता ठाणे रेल्वे स्थानकातील पाच आणि सहा या फलाटाचे रुंदीकरण करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत रेल्वेतर्फे मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 960 लोकल ट्रेन तसेच एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच उष्णता आणि आता मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाला हैराण असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
सध्या लग्नसराई तसेच शाळा, कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियांचा कार्यकाळ सुरू आहे. याचबरोबर पावसाळा देखील तोंडावर आला असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखों प्रवाशांना मेगाब्लॉकचा फटका बसणार. म्हणूनच प्रवाशांना दुसरी सोय करून द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर रेल्वे फलाटाचे हे पावसाळ्यापूर्वी झाले तरी त्यावर पाऊस सुरू व्हायच्या आधी पत्रे घालण्यात येणार का? असा प्रश्न प्रवासी संघटनेतर्फे विचारण्यात येत आहे.