बुलढाणा/प्रतिनिधी – उन्हाळ्याचे दिवस सुरू असून सूर्य जोरदार आग ओकत आहे. त्यात (Buldhana electricity) बुलढाणा महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेल्या ३ दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरांमध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे विद्युत वितरण (Mseb) कंपनी मलकापूरचे एका कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे गेल्या 72 तासांपासून मलकापूर शहरांमध्ये विद्युत पुरवठा बंद आहे. मलकापूर शहराच्या घिर्नी रोड पुरोहित कॉलनी, जाधव वाडी मुकुंद नगर, हनुमान नगर, अश्या अनेक ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे काल रात्री मलकापूर शहरातील (एम.एस.ई.बी) कार्यालयावर शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष जमा झाले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
जिल्ह्यातील चाळीस बिघासारख्या महत्वाच्या भागात मोठी रुग्णालये (Hospital) आहेत. परंतु वीज नसल्याने रुग्णालयात रुग्णांना घेण्यास डॉक्टर तयार नाहीत. पेट्रोल पंपावर व इंडस्ट्रीज एरिया मध्येही विजेचा पुरवठा होत नसल्याने फार मोठे नुकसान होत आहे. मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्गातही असंतोष दिसत आहे. त्याचबरोबर दूध विक्रेत्यालाही लाईन नसल्यामुळे मोठा फटका बसत असल्याची माहिती पेट्रोल पंप चालक मनोज सावजी यांनी दिली. तर प्रशासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे माजी नगरसेवक राजेश मुधोळकर यांनी सांगितले आहे.