नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – नंदुरबार – धुळे जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा पुलाला संततधार पावसाने मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सारंगखेडा येथील तापी नदीवर ब्रिटिशकालीन पूल बांधण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून तापी नदीला मोठा पूर आला. यादरम्यान तापी नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी प्रशासन व पोलीस दाखल झाले असून दोंडाईचा बाजूने पुलाच्या येणाऱ्या भागातील भराव वाहून गेल्याने पुलाला भगदाड पडले आहे. घटनास्थळी शहादा तहसीलदार व पोलीस प्रशासनाने धाव घेतली असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दोंडाईचा पोलिसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलिसांनी अनरद बारी जवळून वाहतूक वळवली. पुलावरील रस्त्याला तडे देखील पडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्याच वर्षी पुल बंद करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती केली होती. असे असताना भराव वाहून भगदाड पडल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सध्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली. तापी नदीच्या काठच्या गावांना नंदुरबार प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा दिला आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने तापी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 111 मीटर तापी नदीची धोक्याची पातळी आहे सध्या 110 मीटर पर्यंत तापी नदीची पातळी सुरू आहे.