नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कायमच सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जपण्याचे काम करतात मंडळाकडून सादर केले जाणारे देखावे आकर्षक असतातच मात्र त्याच बरोबर या देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले जाते.
कल्याण मधील जय गणेश मित्र मंडळ नेतिवलीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ऑनलाइन गेम च्या विळख्यात अडकून असणाऱ्या तरुणांची व्यथा मांडली आहे. तर या गेम मध्ये स्वतःचा आयुष्य नष्ट करणाऱ्या तरुणाईला वाचविण्याची मागणी सरकारकडे केली आहे .
तसेच लोकप्रिय कलाकार देखील तरुणाईचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ऑन लाइन गेमची जाहिरात करताना दिसतात.त्यामुळे अनेक तरुण या ऑन लाईन गेम कडे आकर्षिले जातात, परिणामी त्या गेम च्या आहारी जाऊन कर्जबाजारी होतात,त्यानंतर त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. काहींनी तर या गेम पायी आपले जीव सुद्धा गमावले आहेत.त्यामुळे असल्या गेम ची जाहिरात न करण्याचे आवाहन देखील कलाकारांना मंडळांनी केले आहे.
तसेच भारतीय ऑनलाईन गेम ची मोठी बाजारपेठ असल्याचे जाणून चीन अमेरिकेसारखे देश भारतातील तरुणाईला ऑनलाइन जुगार च्या विळख्यात ओढत आहेत. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, शाहरुख खान यासारखे मोठमोठे कलाकार आणि खेळाडू या जुगाराची जाहिरात करत तरुणाईचे आयुष्य बरबाद करत आहेत.जनता ही कलाकार व खेळाडूंना आपल्या जीवावर मोठे करतात आज हेच लोक जनतेच्या जीवावर उठल्याचे या माध्यमांतून दिसून येत आहे.
या गेम मुळे लाखो रुपये हरलेल्या अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे, त्याच बरोबर फेमस टिक टोंक स्टार असलेल्या तरून ऑन लाइन गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाला. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने घरफोड्या करण्याचा मार्ग पत्करला आणि आता घरफोडीच्या गुन्हात तुरुंगात आहे. ही वस्तुस्थिती दाखवून देत मंडळाने तरुणाईला या गेम पासून दूर राहण्याचे आवाहन करत जनता कलाकारांवर डोळे झाकून विश्वास ठेवते त्या कलाकारांनी देखील जनतेचा विश्वासघात करू नये . यासारख्या जाहिराती तातडीने थांबवाव्यात असे आवाहन मंडळांनी आपल्या देखाव्याच्या माध्यमातून केले आहे.