नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि शिस्तबद्ध मिरवणूकीची अनेक पारितोषिके मिळवलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दिनांक २२ आँगस्ट ते दिनांक २८ आँगस्ट २०२२ या कालावधीत विनामूल्य लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. डोंबिवलीतील पारंपारिक नृत्यनिपूण विवेक ताम्हणकर यांचे मार्गदर्शन लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला लाभले. टिळकनगर शाळेच्या पेंढरकर हाँलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेला १० वर्ष ते ६५ वर्ष या वयोगटातील २५० पेक्षा जास्त पारंपरिक नृत्यप्रेमी उत्साही डोंबिवलीकरांनी प्रतिसाद दिला.
कार्यशाळेच्या पहिल्या पाच दिवसांत ताम्हणकर यांनी सर्वांना लेझिम हातात कसे धरायचे ते घाटी लेझिम, बडोदा लेझिम, हुल पलट, मोर चाल आणि इतर अनेक लेझिम खेळण्याचे प्रकार शिकवले. पेंढरकर हाँलमध्ये लेझिम कार्यशाळेतल्या दिडशे जणांना खेळताना थोडी अडचण होत होती. कार्यशाळेतील सर्वांसाठी विसर्जन मिरवणुकीच्या रंगीत तालमीचे आयोजन टिळकनगर विद्यामंदिर रस्त्यावरील मंडळाच्या आँफिसपासून ते खंडकर रोडवरील गणेश मंदीरापर्यंत संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत करण्यात आले होते. त्यालाही सर्वच प्रशिक्षणार्थिंनी उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजवलेल्या ढोल आणि हलगीच्या तालावर मिरवणूकीत नाचण्याचा आनंद घेतला.
लेझिम कार्यशाळा प्रशिक्षक ताम्हणकर सर आणि मंडळाच्या सोनाली गुजराथी, चैत्राली भावे, सिध्दी वैद्य, श्रुती गणपूले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यशस्वीरीत्या पार पडली असे मंडळाचे अध्यक्ष सुशिल भावे यांनी सांगितले. तसेच त्यांनी या कार्यशाळेला प्रतिसाद देणाऱ्या प्रशिक्षणार्थीचेही आभार मानले.