नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीकर निर्भय संदीप भारती या ११ वर्षीय निर्भयने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया असे ४० किलोमीटरचे सागरी अंतर न थांबता ९ तास ५ मिनिटे पोहून पार करत रेकॉर्ड केला आहे.निर्भयने नवीन वर्षाचे स्वागत अशा प्रकारे केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निर्भय संदीप भारती हा डोंबिवली येथील ओमकार इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकतोय. निर्भयने धरमतर (अलिबाग)ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर 7 तासात पोहून पार करण्याचा निर्धार केला होता. परंतु कासा खडकाच्या पुढे सकाळी १० वाजता वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे समुद्रात लाटा उसळल्या. समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा मारा सहन करत त्याला पुढे गेट वे पर्यंत पोहून जावे लागले. त्यामुळे त्याला निर्धारित वेळेत अंतर कापता आले नाही. त्याने हार न मानता पहाटे अंगाला ग्रीस लावून व समुद्राची पूजा करून ३ वाजून ०५ मिनिटांनी महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक नील लबदे यांच्या निरीक्षणाखाली निर्भयने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात केली.
निर्भय संदीप भारती हा प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली यश जिमखाना मध्ये दररोज ८ ते ९ तास अथक सराव करत होता. त्याची मेहनत व जिद्द पाहून यश जिमखान्याचे मालक राजू वडनेरकर साहेबांनी त्याला रात्रीच्या वेळेस ही सरावासाठी स्विमिंग पूल उपलब्ध करून दिला आणि त्याच्या धाडसी व साहसी मोहिमेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच महिन्यातून ४ वेळा उरण येथील संतोष पाटील सर यांनी त्याच्याकडून समुद्रात सराव करून घेतला. या आधीही निर्भय याने ५ ऑक्टोबरला कारंजा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया असे २२ किलोमीटरचे सागरी अंतर न थांबता ६ तास ३४ मिनिटांत पोहून रेकॉर्ड केला आहे.
निर्भय भारती याला त्याचे वडील संदीप रामचंद्र भारती, आई वृषाली भारती, महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना, ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच यश जिमखाना प्रशिक्षक विलास माने , रवी नवले सर व यश जिमखाना स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे तो हे अंतर सहजरीत्या पार करू शकला. गेट वे ऑफ इंडियाला पोचल्यावर निर्भय चे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व इतर मान्यवरांकडून जंगी स्वागत करण्यात आले. ४० किलोमीटर न थांबता पोहल्यामुळे निर्भयचे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.आता त्याचे पुढील लक्ष फ्रान्सची खाडी पोहायचे आहे.