नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान या कंपनीत २३ मे रोजी दुपारी झालेल्या स्फोटात १२ जण मृत्युमुखी पडले. ६५ जणांना यामध्ये दुखापत झाली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात ३०४ ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. ज्याचा तपास गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना नाशिक मधून ताब्यात घेण्यात आले. मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. तर मलय मेहता यांना अटक करत न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेला 29 मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती.
आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या जे या कंपनीचे पार्टनर आणि डायरेक्टर असल्याने पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी कल्याण न्यायालयाच्या सर न्यायाधीश श्रीमती एस एस राऊळ यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील पी. सकपाळ यांच्यात युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी वकीलातर्फे तपास पूर्ण करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, रिअॅक्टर नेमका कुठून आणला आहे याची माहिती मिळवणे या अशा अनेक बाबींसाठी आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. तर सम्राट ठक्कर यांनी राजस्थान न्यायालयाने औद्योगिक विभागात जर असा अपघात घडला तर त्याला 304 ए कलम लागू होत नसल्याचा दावा करत कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता. ही नैसर्गिक घटना असून तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत पोलीस कोठडी सात दिवसांची देऊ नये असा युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस एस राऊळ यांनी मलय मेहता आणि स्नेहा मेहता याना 31 मे पर्यंत म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.