नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – गणेशोत्सवासाठी तब्बल १३ लाख चाकरमानी कोकणात दाखल होणार असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयात १५ मदत केंद्र उभारण्यात आले असून १२७१ पोलीस कर्मचारी तर ८६ अधिकारी हे या काळात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही तक्रारी अथवा मदतीसाठी ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेव्दारे केले आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेत साजरा केला जातो, या महत्त्वाच्या उत्सवासाठी लाखों चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. यंदा १३ लाख चाकरमानी दाखल होणार आहेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन केले असून सर्व विभागांच्या यासंदर्भात बैठकाही घेण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून गावोगावी जाऊन बैठका घेतल्या जात आहेत, जवळपास ३१०० बसेस चाकरमान्यांना घेऊन शनिवार पासून जिल्हयात दाखल होणार आहेत. यासाठी एसटी महामंडळ, पोलीस दल, महसूल विभागाकडून महामार्गावर मदत केंद्रही उभारण्यात आले आहेत.
१३ ठिकाणी शांतता कमिटीची बैठक ही पोलीस दलाने यशस्वीपणे घेतल्या असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.रत्नागिरी शहरात प्रीपेड रिक्षा वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरू करणार,गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांकडून अनावश्यक जादा भाडे आकारले जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षा संघटना ची बैठक घेतली, मीटर प्रमाणे भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली आहे, या बैठकीला आरटीओ विभागाचे अधिकारी ही उपस्थित होते. तसेच रेल्वे स्टेशन येथे लाखो चाकरमानी दाखल होणार असल्याने शहर बसेसच्या फेऱ्यादेखील वाढवण्याच्या सूचना प्रशासनाने एसटी विभागाला दिल्या आहेत.