महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी ठाणे

सार्वजनिक वाचनालय व केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – शब्दांची ताकद खूप मोठी असून नवलेखकांनी प्रस्तावनेच्या कुबड्या हाती घेण्या पेक्षा आपल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःची ताकद दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ पानिपतकार विश्वास पाटील यांनी आज केले. लेखकांनी टीपकागदाप्रमाणे आपले जीवन टिपण्याची आवश्यकता असून तुम्ही उत्तम लिहिलं तर लोक तुम्हाला शोधत येतील असा विश्वासही पाटील यांनी दिला. सार्वजनिक वाचनालय व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना लेखक विश्वास पाटील यांनी वाचकांशी संवाद साधला.

या सोहळ्यात कवी संजय चौधरी (आतल्या विस्तवाच्या कविता) व कवियत्री योगिनी सातारकर-पांडे (शब्द जायबंदी होण्याचे दिवस)यांना विश्वास पाटील यांच्या हस्ते कवी माधवानुज पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कथालेखक नागेश शेवाळकर (त्रिकोणीय सामना)व दयाराम पाडलोस्कर (बवाळ )यांना कथालेखक दि.बा.मोकाशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुळकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, महापालिका सचिव संजय जाधव, परीक्षक प्रा.दीपा ठाणेकर, हेमंत राजाराम, विश्वस्त अँड. सुरेश पटवर्धन, प्रा.जितेंद्र भामरे, अरविंद शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन लेखकांना मार्गदर्शन करताना विश्वास पाटील म्हणाले की, अनेक जण आपल्या पुस्तकाला नामवंतांची प्रस्तावना घेण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्याची काहीच गरज नाही. तुमच्या जवळ असलेले अनुभव व शब्द याचे सामर्थ्य ओळखले तर निश्चितपणे कसदार लेखन होऊ शकते. आपल्या कोणत्याही कादंबरीला कोणाचीही प्रस्तावना घेतली नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ऐतिहासिक, सामाजिक कादंबल्यामध्ये मी कोणताही फरक करीत नाही. फक्त त्यातील पात्रांची भाषा, खास आणि ध्यास तुम्हाला कळला पाहिजे. तसे झाले तर पुढचा जमाना तुमचाच असेल असेही विश्वास पाटील यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या गाजलेल्या पानिपत कादंबरीचे उदाहरण दिले.

विश्वास पाटील यांनी पानिपत ही कादंबरी लिहिण्यामागे आपल्या वडिलांची प्रेरणा असल्याचे भाषणात सांगितले. त्याचा किस्सा नमूद करताना जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले एका कार्यक्रमात मला सहभागी होऊ दिले नाही. याचे खूप वाईट वाटले.ही बाब घरी आल्यानंतर मी वडिलांना सांगितले व ते म्हणाले हातामध्ये लगोरी घेऊन गावातील चिमण्या मारण्यापेक्षा वाघाच्या छावणीमध्ये का जात नाही? असे वडिलांनी सांगितले.त्यानंतर मी अंतर्मुख होऊन तब्बल ६ वर्षे फक्त पानिपत पानिपत, आणि पानिपाताचाच विचार केला. त्यानंतर ही रेकोर्ड ब्रेक कादंबरी साकारली.

यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या प्रगती साठी महानगरपालिका मदतीचा हात पुढे करेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुळकर्णी यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×