नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फंत आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे आज आयोजित करण्यात आलेला शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी उपस्थित शिक्षकांना व विद्यार्थी वर्गाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यासमयी शिक्षण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अवधुत तावडे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, प्रशासन अधिकारी रंजना राव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपला विद्यार्थी सर्वोच्च पदाला पोहचणे हाच खरा शिक्षकाला मिळालेला पुरस्कार आहे, असे उद्गार माहिती व जनसंपर्क विभागाचे विभागप्रमुख संजय जाधव यांनी यावेळी बोलताना काढले, तर शिक्षक हा भारतीय संस्कृतीवर दुरगामी परिणामी करणारा घटक असून शिक्षक हाच खरा शिक्षणाच्या पायाचा, मैलाचा, शिखराचा दगड आहे, असे प्रतिपादन उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आपल्या भाषणातून केले.
शिक्षक दिन दरवर्षी साजरा करायला हवा, कारण शिक्षक मुलांना जे ज्ञान देतात त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करावयाचा हा दिवस आहे, असे उद्गार शिक्षण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे सर्व उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात महापालिकेच्या व खाजगी अनुदानित प्रार्थमिक शाळांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करणा-या ६ शिक्षकांना, २ शाळांना अनुक्रमे आदर्श शिक्षक/आदर्श शाळा पुरस्कार इयत्ता ४थी व इयत्ता ७वी च्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या एका विद्यार्थ्यास व ६ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या विशेष नैपुण्याबाबत उपस्थित मान्यवर अधिका-यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी शिक्षणाधिकारी रविंद्र जगदाळे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री विजय सरकटे, शिक्षणाधिकारी यांनी केले .