नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – राम नवमी चा सण दरवर्षी भारत तसेच जगभरातील लाखो हिंदूंद्वारे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भगवान रामासाठी साजरा होणारा हा उत्सव लोक अत्यंत सामंजस्याने साजरा करतात. या दिवशी भक्त बालक रुपात भगवान रामची पूजा करतात. भाविक हा शुभ दिवस उपवास करुन आणि राम कथा पाठ करुन साजरा करतात. राम नवमी चा हा शुभ दिवस भगवान रामाच्या जन्माचे स्मरण करतो, जो भगवान विष्णूचा सातवा अवतार मानला जातो आणि धार्मिकता, सद्गुण आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे.
आज राम नवमीच्या निमित्ताने आज नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. राम नवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे. झेंडूच्या फुलांचं तोरण, मंदिराच्या बाहेर खास रांगोळी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात सुरू झाली आहे. राम नामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच काळाराम मंदिराकडे सरदार चौकापासून जाणारा रस्ता अरूंद असल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ धोकादायक ठरु शकते. हे लक्षात घेऊन भाविकांच्या सुरक्षेसाठी सरदार चौक ते काळाराम मंदिर रस्ता सकाळी सात ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.