नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील दहा वर्षांपूर्वीची जुनी सीटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होत आहे .सीटी स्कॅन मशिनसाठी जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्र सरकारकडे निधीची मागणी करून सुद्धा अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे शासन चे लक्ष वेधण्यासाठी हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय बी ब्लॉक येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून उपचारांसाठी येणाऱ्या बहुतांश रुग्णांची सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता असते. बाहेर खासगी रुग्णालयांत हजारो रुपये सिटी स्कॅनसाठी मोजावे लागतात. मात्र, तेच जिल्हा रुग्णालयात मोफत होत असल्याने शेकडो रुग्णांसाठी मोठा दिलासा होता. परंतु रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटर ची सुविधा असलेल्या ॲम्बुलन्स मधून सिटीस्कॅन करण्यासाठी इतर रुग्णालयात जावे लागते.
शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली पण ती फक्त कागदावरच राहिलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ केली जाते त्यामुळे रुग्णालयाला सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करणे बंधनकारक करावे तसे कायदे करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.