Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

डोंबिवली एमआयडीसीमधील जुन्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी

डोंबिवली/प्रतिनिधी- डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक असून त्या बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली असून यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देण्याचे आवश्यक असल्याचे मत राजू नलावडे यांनी व्यक्त केले आहे. 

  डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी सत्तरच्या दशकात जमिनीखालील सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती. निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे १९८५ नंतर सुरू करण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिन्या या कंपन्यांचे सांडपाणी वाहून त्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सीइटीपी त्यानंतर प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेले हे सांडपाणी खाडीत सोडले जाते. 

औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे कंपन्यांचे सांडपाणी मधील सिओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) याचे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा त्यात वाढ झाल्यास व इतर रासायनिक घन कचरा आल्यास त्या जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमधून वाहून जातांना वाहिन्यांवर दाब येऊन किंवा चोकअप होऊन त्या वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. या नादुरुस्त वाहिन्यामधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाजूचा उघड्या नाल्यात किंवा रस्त्यावर वाहते. त्यावेळी त्याचे रासायनिक प्रदूषण होऊन त्याचा उग्र वास आजूबाजूचा परिसरात पसरला जातो. शिवाय ते प्रदूषित न प्रक्रिया केलेले सांडपाणी उघड्या नाल्याद्वारे खाडी, नदीत जाऊन त्यातील पाणी प्रदूषित होत असते.

       एमआयडीसी निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची स्थिती पण अतिशय खराब झाली आहे. त्या जुन्या झालेल्या वाहिन्यांना रस्ते दुरुस्ती, महानगर गॅस, पाण्याच्या पाइपलाइन तसेच केबल टाकताना त्यांना धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या असाव्यात. शिवाय त्यात वृक्षांची खोलवर गेलेली खोड/मुळे वाहिन्यांत शिरून वाहिन्या खराब झाल्या आहेत. निवासी भागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत असते.

  नादुरुस्त, जीर्ण, जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण इत्यादी यांचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. एमआयडीसी कडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. याकामासाठी जरी काही दिवसांनी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, टेंडर काढणे इत्यादी कामांसाठी काही महिने/वर्षे जातील त्यानंतर सदर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्ष जातील. त्यामुळे आरोग्य, प्रदूषण याविषयी असलेल्या या महत्त्वाचा प्रश्नात हे काम तातडीने लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X