नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे तालुक्यातील तरवाडे येथे आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. धुळे तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती भीषण व भयावह आहे. पिके करपली. जलसाठे आटलेत जनावरांचा चाराही संपला. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहिर करत शेतकरी बंधूंना मदतीचा हात द्यावा. आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. रस्त्यावर उतरुन अजुन तिव्र आंदोलन छेडण्याची वेळ शासनाने आणू नये. तात्काळ दुष्काळ जाहिर न केल्यास धुळे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्का जाम केला जाईल, असा इशारा यावेळी बोरकुंड गावाचे प्रथम माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी दिला.
आज धुळे तालुक्यात झालेल्या या चक्का जाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधीत करताना माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी, शेतकरी बंधूंनो हवालदिल न होता परिस्थितीशी दोन हात करा, सर्व पर्याय संपले तरीही टोकाचे पाऊल मात्र उचलू नका, असे भावनिक आवाहनही केले. यावेळी बाळासाहेब भदाणे पुढे बोलताना म्हणाले की, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धुळे तालुक्यासह सर्वदूर बिकट परिस्थिती आहे. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करत गुरांसाठी चारा छावणी, पाण्याची समस्या असेल तिथे टॅकरची सोय, शेतकरींना भरीव मदत आदींचे नियोजन करावे. लवकरात लवकर पंचनामे करत कोरडा दुष्काळ जाहिर करावा. यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. तसेच वेळ पडली तर तालुकाभरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनही केले जाईल, असा इशाराही बाळासाहेब भदाणे यांनी यावेळी दिला.