नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयतर्फे दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी आवेदने मागवली जातात. 2022 च्या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करणारी अधिसूचना www.yas.nic.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन/भारतीय क्रीडा प्राधिकरण/मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ/क्रीडा प्रोत्साहन मंडळे/राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे इत्यादींना देखील त्यानुसार सूचित केले गेले आहे.
पुरस्कारासाठी पात्र खेळाडू/प्रशिक्षक/संस्था/विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या वर्षीपासून,या कार्यासाठी समर्पित एका पोर्टलद्वारे केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना केवळ dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर अधिकारी/विशिष्ट व्यक्तींच्या शिफारशीशिवाय स्वत: अर्ज करण्याची परवानगी आहे. ऑनलाइन अर्जामध्ये कोणतीही समस्या आल्यास, अर्जदार क्रीडा विभागाशी section.sp4-moyas[at]gov[dot]in या ई-मेल आयडी किंवा .011-23387432 या दूरध्वनी क्रमांकावर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत संपर्क साधू शकतो.पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंचे अर्ज dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी हे क्रीडा पुरस्कार दिले जातात.
यासाठीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोणत्याही एका खेळाडूला दिला जातो. चार वर्षांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी पदक विजेते खेळाडू तयार केल्याबद्दल प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. तर ध्यानचंद पुरस्कार क्रीडाक्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार आहे.
ज्यांनी क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ दिला जातो. आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अब्दुल कलाम आझाद (MAKA) करंडक पुरस्कार दिला जातो.