नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदतीत वाढ करत आता ती 31 जुलै 2023 ऐवजी 31 ऑगस्ट 2023 अशी केली आहे. सामान्य जनतेच्या माहितीसाठी असे कळवण्यात येत आहे की https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक असलेले आणि भारताचा रहिवासी असलेले कोणतेही लहान मूल, ज्याचे वय 18 वर्षांहून जास्त नाही (अर्ज/ नामांकन सादर करण्याच्या अंतिम तारखेला) या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकते. अथवा कोणतीही इतर व्यक्ती देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुलाचे नामांकन सादर करू शकते. पीएमआरबीपीसाठीचे अर्ज केवळ या पुरस्कारांसाठी विहित केलेल्या https://awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील.